कुकडेश्वर येथील आयोजित मेळाव्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा सेनेत प्रवेश
जुन्नर-कुकडेश्वर (ता. जुन्नर) येथे आयोजित मेळाव्यात आदिवासी नेत्यांसह लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधले. यावेळी आदिवासी भागाचे नेते काळूराम शेळकंदे, मारुती वायाळ, राजाराम बोऱ्हाडे यांच्या समवेत आदिवासी गावातील कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, भिवंडीचे आमदार रुपेश म्हात्रे, शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा, शिवसेना जिल्हाप्रमुख पै. माऊली कटके, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, गुलाब पारखे व सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
आदिवासींच्या विकासासाठी उर्वरित आयुष्य खर्च करणार असल्याचे यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगतिले. तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत करून आदिवासी भागाच्या न्याय हक्कासाठी व विकासासाठी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विकासाच्या योजना मोठ्या प्रमाणात राबवून हा भाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे जाहीर केले.