टप्पा क्रमांक तीनममध्ये वाहतूककोंडीने नागरिक हैराण
शिंदे वासुली – चाकण एमआयडीसी टप्पा तीनमधील रस्त्याला लहान मोठे खड्डे पडून अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वारंवार वाहतूककोंडी होत असल्याने स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.
एमआयडीसी टप्पा तीन मधील फोक्स वॅगन कंपनी ते मर्सिडीज बेंज हा पुणे-नाशिक महामार्गाला जोडणारा औद्योगिक वसाहतीतील महत्त्वाचा रस्ता आहे. चाकण एमआयडीसी टप्पा दोन, तीन, चारमधील कंपन्यांचा उत्पादित व कच्चा माल पुणे, नगर, आळंदी एमआयडीसी, वाघोली आदी भागांकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. औद्योगिक वसाहतीतील कामगार वर्ग याच रस्त्याने प्रवास करतात. हा रस्ता सदैव गजबजलेला असतो. अनेकवेळा सकाळी आणि संध्याकाळी महाळूंगे, एचपी चौक, स्पायसर चौक (आळंदी फाटा) येथे वाहतूककोंडी होत असते. सतत वर्दळ असलेला हा रस्त्यावर मात्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
फोक्स वॅगनकंपनी पासून आळंदी फाट्याकडे जाणारा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. रस्ता वर्दळीचा असल्याने खड्डा चुकवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. दुचाकीस्वारांची व्यथा तर यापेक्षा अधिक कष्टप्रद आहे. रस्त्याची आणि वाहतुकीची अशी दुरवस्था झाल्याने येथील उद्योजकांनी एमआयडीसी प्रशासनाकडे रस्ता तातडीने दुरुस्ती करण्याची विनंती केली आहे.