नवी दिल्ली – छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची मानसिकता संपुष्टात आणली. शिवाजी महाराजांनी भारताची एकता आणि अखंडता सर्वोतोपरी ठेवली. त्यामुळे आज एक भारत-श्रेष्ठ भारत या योजनेमध्ये शिवाजी महारांच्या विचारांचे प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार आज 350 वा राज्याभिषेक दिन आहे. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना संबोधित केले आहे. सुरुवातीला त्यांनी या दिवासाचे महत्त्व स्पष्ट करत शिवाजी महाराजांना नमन केले. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातील जनतेसाठी फार भाग्याचा दिवस असल्याचं देखील पंतप्रधानांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, छत्रपती शिवाजी महारांचा राज्याभिषेक दिन हा नवी चेतना आणि नवी उर्जा घेऊन आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा त्या काळातील एक अद्भुत आणि विशेष सोहळा आहे. राष्ट्र कल्याण आणि लोककल्याण हे त्यांच्या शासन व्यवस्थेचे मूळ तत्व होते.
तसेच शेकडो वर्षांपूर्वी गुलामगिरीने आणि आक्रमणांनी देशातील लोकांचा आत्मविश्वास हिसकावून घेतला होता. शत्रूच्या शोषणाने आणि गरिबीने समाजाला कमकुवत केले होते. आपल्या सांस्कृतिक स्थळांवर हल्ला करुन लोकांचे खच्चीकरण केले होते. परंतु त्यावेळी जनतेला आत्मविश्वास परत मिळवून देण्याचे कठीण कार्य शिवाजी महाराजांनी त्या काळात केले होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांचा सामना केलाच पण त्यांनी स्वराज्यस्थापनेचा विश्वास देखील जनतेमध्ये निर्माण केला. त्यांनी लोकांना राष्ट्रनिर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले, असेही ते म्हणाले.