मुंबई – आध्यत्मिक मालिकांची प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. या विषयावर जेव्हा-जेव्हा मालिका बनल्या आहेत, तेव्हा त्या प्रेक्षकांना खूप आवडल्या आहेत.अशा प्रेक्षकांसाठी लवकरच ‘शिव शक्ति-तप, त्याग, तांडव’ नावाची हिंदी मालिका कलर्स वाहिनीवर सुरु होणार आहे. या मालिकेच्या कथेत भगवान शिवाचा कर्तव्य, त्याग आणि सामर्थ्यापासून विभक्त होण्याचा प्रवास पाहायला मिळणार आहे.
कोणतीही मालिका भव्यदिव्य बनवण्यात कला दिग्दर्शनाचा मोठा वाटा असतो. या मालिकेचे भव्य सेट दिग्गज दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी बनवले आहेत. ते म्हणतात, “गेल्या तीस वर्षांपासून आम्ही पौराणिक शोचे सेट बनवत आहोत. अशा शोसाठी सेट्स बनवताना कथा लक्षात घेऊन त्यानुसार सेट कसे डिझाईन करायचे हे लक्षात ठेवावे लागते.
शिव-शक्तीच्या अफाट सामर्थ्याचे दर्शन या शोमधून होणार आहे. यासाठी विविध मोठं मोठे सेटही उभे करण्यात आले आहेत. ज्यामध्ये कैलास, वन, इंद्र लोक, असुर लोक आणि दक्ष दरबार अशा प्रकारच्या विविध सेटचा वापर केला जाणार आहे. मालिकेला अधिक भव्य दिव्य बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हीएफएक्स चा वापर केला जाणार असल्याचे देखील समजते.
या मालिकेत राम यशवर्धन आणि सुभा राजपूत अनुक्रमे शिव आणि शक्तीच्या भूमिकेत आहेत. या मालिकेमध्ये शिवभक्तांना भगवान शंकरांच्या अनेक पैलूंचे दर्शन होणार आहे. पालनहार ते विनाश नाशक अशी भगवान शिव शंकरांची वेग वेगळी रूपे यावेळी प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा शो कलर्स वाहिनीवर 19 जूनपासून प्रसारित होणार आहे.