‘अर्णब’ प्रकरणात भाजप तांडव का करीत नाही?”

मुंबई – वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘तांडव’ या वेब सिरीजचा डायरेक्‍टर अली अब्बास जाफरने नुकतंच ट्‌विटरवर माफी मागून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘तांडव’ या वेबसिरीजमध्ये दाखवलेली कथा आणि प्रत्यक्षातील घटना यामधील साधर्म्य हा केवळ एक योगायोग आहे. या वेबसिरीजमधील कलाकार आणि निर्मात्यांना कोणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही. असं अली ने ट्विटमध्ये म्हंटलं.

दरम्यान, या सर्व “तांडव’ प्रकरणानंतर आता  शिवसेनेनं सामना अग्रलेखातून  आपली भूमिका मांडली. असून भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.

 काय आहे सामनाच अग्रलेख वाचा सविस्तर

‘तांडव’चे निर्माते व दिग्दर्शकांविरोधात भाजपने उत्तर प्रदेश, बिहारात गुन्हे दाखल केले हे चांगलेच झाले, पण जवानांच्या हौतात्म्याचा अपमान करणाऱया गोस्वामीविरोधातही भाजप असे गुन्हे जागोजागी दाखल करणार असेल तर ते खरे मर्द. अर्णब गोस्वामीच्या देशद्रोहासंदर्भातदेखील चर्चा घडली तर पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा आत्मा शांत होईल.

शंभर ग्रॅम गांजा कुणाकडे पकडला म्हणून ‘तांडव’ करणारा मीडिया अर्णबच्या देशद्रोही कृत्यावर ‘राष्ट्रीय बहस’ करायला तयार नाही. कारण त्यांचे स्वातंत्र्य, राष्ट्राभिमान त्यांनी कुणाच्या तरी चरणावर गहाण ठेवला आहे. स्वातंत्र्याचा, राष्ट्रवादाचा लढा इतरांनी लढायचा, हे मात्र राष्ट्राचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणार! सगळाच धंदा झालाय, दोष तरी कुणाला द्यायचा? ‘तांडव’ सुरू आहे, ते चालतच राहील!

भारतीय जनता पक्ष म्हणजे सध्या हास्यविनोदाचा विषय झाला आहे. रोज नवी सोंगे-ढोंगे आणून जनतेचे मनोरंजन करण्याचा प्रयोग ते करीत असतात, पण त्यांचे टुकार प्रयोग जनतेच्या पसंतीस उतरत नाहीत. ‘तांडव’ नावाची एक वेब सीरिज सध्या प्रदर्शित झाली आहे. सध्याच्या राजकारणाचे वास्तव दाखवणारी ही सीरिज असल्याचे सांगतात. दिल्लीचे राजकारण, विद्यापीठातील राजकीय चढाओढ असे काही विषय त्यात घेतले आहेत, पण या सीरिजमध्ये हिंदू देवदेवतांविषयी काही आक्षेपार्ह विधाने असल्याचा बोभाटा भारतीय जनता पक्षाने केला.

भगवान शंकर आणि नारदाच्या संवादातून श्रीरामाचा उल्लेख उपहासात्मक पद्धतीने झाल्याचे ‘तांडव’ भाजपने सुरू केले. हिंदू देवदेवतांबाबत कोणत्याही प्रकारची अपमानास्पद विधाने शिवसेनेने कधी खपवून घेतली नाहीत. एम.एफ. हुसेन हे नक्कीच महान चित्रकार होते, पण त्यांनी हिंदू देवतांची चित्रे ज्या पद्धतीने रेखाटली त्यावर शिवसेनेने आक्षेप घेतला.

वाद इतका पेटला की, एम.एफ. हुसेन यांना देश सोडून जावे लागले. त्यामुळे हिंदू देवदेवतांच्या अवमानप्रश्नी कोणतीही तडजोड शक्यच नाही, पण भारतीय जनता पक्षाने जे ‘तांडव’ सुरू केले आहे, त्यात प्रामाणिकपणाचा लवलेश नक्की किती ही शंका आहेच. कारण जो ‘तांडव’विरोधात उभा ठाकला आहे तोच भाजप भारतमातेचा अवमान करणाऱया त्या अर्णब गोस्वामीसंबंधात तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प का बसला आहे? हिंदुस्थानी सैनिकांचा, त्यांच्या हौतात्म्यांचा घोर अपमान जितका गोस्वामीने केलाय तितका अपमान पाकडय़ांनीही केला नसेल.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए.के. ऍण्टनी यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, सलमान खुर्शीद आणि गुलाम नबी आझाद यांनीही बुधवारी पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची तसेच ‘सरकारी गोपनीयता अधिनियमा’अंतर्गत कारवाई होण्याची मागणी केली आहे. हा सगळा प्रकार म्हणजे देशद्रोहच…

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.