फडणवीसांविरोधात शिवसैनिकांच्या घोषणा
मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर गेलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी संतप्त शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शिवाजी पार्क येथील मैदानात फडणवीस आल्याचे पाहताच उपस्थित शिवसैनिकांनी “मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन!…’ अशा घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला. अखेर शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतींना अभिवादन करत फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी न बोलता तेथून काढता पाय घेतला.
विधानसभा निवडणूकीनंतर शिवसेना-भाजप महायुतीला बहुमत मिळाले असतानाही मुख्यमंत्रीपदावरून या दोन्ही पक्षात तेढ निर्माण झाला आहे. भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचा कोणताही शब्द दिला नसल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोटे ठरवले होते. त्यामुळे भाजपासोबत मतभेद झाल्यानंतर शिवसेनेने महायुतीतून बाहेर पडत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रससोबत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा रविवारी पुण्यतिथीदिन होता. पुण्यतिथिदिनानिमित्त शिवाजीपार्क येथील शिवतीर्थावर त्यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील शिवसेनाप्रमुखांचे चाहते, शिवसैनिकांची रिघ लागली होती. यापार्श्वभूमिवर भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे व भाई गिरकर शिवतीर्थावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचा कोणीही नेता तेथे हजर नव्हता. फडणवीसांना पाहून शिवसैनिकांनी “मी पुन्हा येईन…. मी पुन्हा येईन…. मी पुन्हा येईन…’ अशा घोषणा दिल्या. अखेर भाजपच्या या नेत्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करत तेथून निघून गेले.