पुणे : शहरातील रस्त्यांवर झालेल्या बेसुमार खोदाईने पावसाळयात रस्त्यांवर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्डयांमुळे वाहतूक कोंडी तसेच अपघात घडत असून महापालिका प्रशासनाने तातडीन शहरातील रस्ते पूर्ववत करावेत अशी मागणी शिवसेनेच्या (शिंदेगट) शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. भानगिरे यांच्यासह खडकवासला विभाग प्रमुख निलेश गिरमे, शिवाजीनगर विभाग प्रमुख संजय डोंगरे, राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष उल्हास तुपे यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
याबाबत बोलताना भानगिरे म्हणाले की, शहरातील रस्त्यांची मोठया प्रमाणात दुरावस्था झालेली असून त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत असून अपघातांची संख्या वाढली आहे. हड्पसर येथेही दोन दिवसांपूर्वी अशाच वाहतूकीमुळे बाप-लेकीचा मृत्यु असून या प्रकरणी जबाबदार असलेल्यास संबधित अधिकाऱ्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.
या शिवाय, हडपसर भागातील सय्यद नगर येथील भुयारी मार्गाचे काही रखडलेले असल्याने या भागात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही बाब लक्षात घेता पालिका प्रशासनाने तातडीनं या मार्गाचे काम वेगाने करावे तसेच निधीची आवश्यकता असल्यास त्यासाठी आपण शासनाकडून निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. या वेळी पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अद्याप मिळालेला नसल्याने हे वेतनही तातडीनं द्यावे अशी मागणी करण्यात आल्याचे भानगिरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महापालिका आयुक्तांनी या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
शालेय पोषण आहारासाठी मुदतवाढ द्यावी
दरम्यान, यावेळी, महापालिका शाळांसाठी मध्यान्ह भोजन पुरविण्यासाठी काढण्यात आलेल्या सेंट्रल किचनच्या निविदेस मुदतवाढ देण्याची मागणीही शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. या निविदांसाठी देण्यात आलेली मुदत कमी असल्याने ही मुदतवाढ मागण्यात आल्याचे भानगिरे म्हणाले.