सातारा – शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाच्या मालकीची ट्रॅक्टर-ट्रॉली चोरल्याची घटना घडली आहे. साताऱ्यामधून पाच लाख रुपये किंमतीची ट्रॅक्टर-ट्रॉली अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. याप्रकरणी संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाठ यांच्या तक्रारीनंतर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
3 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास सातारा परिसरातील गट क्रमांक 92 मधील तंत्रनगर येथे असलेला लाल रंगाचा महिंद्रा ट्रॅक्टर (क्रमांक Mh-20-Fu-8926) अज्ञात व्यक्तीने चोरला आहे. अंदाजे पाच लाख रुपये किमतीची ट्रॅक्टरसह ट्रॉली चोरून नेल्याचे सिद्धांत शिरसाठ यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणी सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी नगरसेवक सिद्धांत संजय शिरसाट यांनी त्यांच्या व्यवसायासाठी ट्रॅक्टर खरेदी केला होता. हा ट्रॅक्टर त्यांनी 3 मे रोजी सायंकाळी सातारा परिसरातील तंत्रज्ञनगर येथे उभा केला होता. पण ट्रॅक्टर चोरी झाल्याची घटना दुसऱ्या दिवशी 4 मे रोजी सकाळी 9 वाजता उघड झाली.
दरम्यान, अनेकदा चोरी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र यावेळी थेट आमदाराचाच घरचा ट्रॅक्टर चोरट्यांनी चोरी केल्याने या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच राजकीय नेतेच सुरक्षित नाही, तर सामान्य लोकांची परिस्थिती काय असणार? असा प्रश्न यातून उपस्थित केला जात आहे.