शिर्डी – समृध्दी महामार्ग आणि विमानतळ शिर्डीच्या विकासातील जमेच्या बाजू आहेत. यामुळेच आता औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या कंपन्या येण्यास उत्सुक आहेत. यातून शिर्डी व परिसरात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. यामुळे शिर्डी भविष्यात औद्योगिक विकासाचे मोठे केंद्र ठरेल, असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला.
“शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून मंत्री विखे यांनी शिर्डी शहरातील विविध भागातील नागरीकांशी संवाद साधला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर, राहाता तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, शिर्डी चे पोलीस निरीक्षक नंदकुमार धुमाळ, शिर्डी नगरपरिषद मुख्याधिकारी सतिष दिघे, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, प्रतापराव जगताप, कमलाकर कोते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महसूलमंत्री विखे म्हणाले, शेती महामंडळाच्या जागांचा जनहितासाठी उपयोग करण्यास राज्य सरकारने दिलेली मंजूरी ही शिर्डी आणि परीसराच्या विकासासाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे. साईबांबाच्या जीवनावरती एक थिमपार्क उभारण्याचा आपला प्रयत्न असून यासाठी आता शेती महामंडळाच्या जागेचा उपयोग करण्यात येईल. या जागेवर आयटी पार्क, लॉजेस्टिक पार्क उभारून रोजगारच्या संधी निर्माण करण्यावर भर आहे, असे ते म्हणाले.
शिर्डीसाठी 52 कोटी
शिर्डीच्या विकासासाठी आपण कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. शिर्डी सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला असून यासाठी राज्य सरकारने 52 कोटी रुपयांच्या निधी देणार आहे. शिर्डी सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे महसूल मंत्री विखे यांनी सांगितले.