पुणे – वेळ दुपार दोनची, काळे ढग दाटून येताच सर्वत्र काळोख पसरला आणि क्षणातच जोरदार पावसाला सुरवात झाली. यंदाच्या हंगमातील हा पहिलाच मोठा वळिवाचा पाऊस ठरला. यात शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, मगरपट्टा, कोथरूड, पाषाण, कात्रज परिसरांत जोरदार सरी कोसळल्या. त्यामध्ये हडपसर परिसरात सर्वाधिक 20, तर शिवाजीनगरमध्ये 13.5 मिमी पावसाची नोंद झाली. पण, या इतक्याच पावसाने प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले, तर पालिकेच्या कथित नालेसफाईचीही पोलखोल झाली.
सलग तीन ते चार दिवसांपासून उष्णतेचा पारा वाढलेला पारा आज खाली आला होता. त्यात रविवार सुट्टीचा असल्यामुळे बाहेर फिरण्यासह बाजरपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली. मात्र, पावसामुळे सर्वांची धांदल उडाली. पंधरा मिनिटे ते अर्धा तास झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. कोरेगाव पार्क येथील बार्टी ऑफीससमोर साचलेल्या पाण्यामुळे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या. तसेच पुणे एसटी स्टॅंड, नळस्टॉप चौक, शिवाजीनगर चौक, जंगली महाराज रस्ता यासह औंध, बाणेर रोड, कोथरूड, पुणे विद्यापीठ रोड, सर्किट हाऊस, हडपसर, मगरपट्टा, धनकवडी, कात्रज, बावधन यासह अन्य भागातील रस्ते, चौकात पाणी साचले होते. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
वाहतूक कोंडीही पाचवीला पूजलेली
शालेय वस्तू खरेदीसाठी आलेल्यांची धांदल…
अवघ्या दहा दिवसांवर शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपासून शालेय वस्तू, पुस्तक, वही खरेदीसाठी पालकांसह विद्यार्थ्यांची अप्पा बळवंत चौक, रविवार पेठ यासह उपनगरातील दुकानांमध्ये गर्दी केली आहे. त्यात आज सुट्टीचा दिवस असल्याने नागरिक घराबाहेर पडले आणि धो धो पावसाने नागरिकांची तारांबळ उडवली. दरम्यान, अर्धा तासाच्या पावसानंतर पाऊस थांबला आणि पुन्हा आकश निरभ्र झाले.
पावसाळी वाहिन्यांची कामे करून घ्या…
शहरात अवकाळी पावसाने वेळोवेळी महापालिका प्रशासनाला जागे करण्याचे काम केले आहे. या किरकोळ पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून वाहतूक ठप्प झाली. मान्सून येण्यास आणखीन आठ ते दहा दिवस आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तत्काळ पाणी साचण्याची ठिकाणे शोधून उपाययोजना करव्यात. यंदा कमी दिवसांत पाऊस जास्त पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे कमी वेळेत मोठा पाऊस झाल्यास त्याचा निचरा होण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातही जोरदार सरी, शहरात तापमान घटले
शहरासह जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यात निमगिरी येथे 35 तर माळीमध्ये 36 मिमी पावसाची नोंद झाली. लवासा येथे 15, भोर येथे 27.5, लोणावळा, नारायण, गिरीवन आणि बारामती येथे प्रत्येकी 1, पुरंदर आणि खेड मध्ये 2.5, राजगुरूनगर, इंदापूर आणि तळेगाव येथे प्रत्येकी 0.5 मिमी पावसाची नोंद झाली. शहरातील कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. पावसामुळे 39 अंशावरील कमाल तापमान 35 अंशापर्यंत खाली आले. दरम्यान, पुढील दोन शहरात दुपारनंतर ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.