शिक्रापूर – करंदी (ता. शिरूर) येथील वरपे वस्ती येथून जातेगाव येथे शाळेमध्ये चाललेल्या मुलींच्या दुचाकीला घेऊन ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक बसली. या झालेल्या अपघातात कीर्ती भगवान वाडेकर (वय 17, रा. पिंपळे जगताप ता. शिरूर) हिचा जागीच मृत्यू झाला. तसेच वेदांती प्रवीण निकम (वय 17, रा. पिंपळे जगताप ता. शिरूर) ही गंभीर जखमी झाली.
याबाबत अशोक गुलाबराव वाडेकर (रा. पिंपळे जगताप ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी ट्रॅक्टर चालक विशाल पंढरीनाथ मारणे (रा. विठ्ठलवाडी ता. शिरूर) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
येथील करंदी-जातेगाव रस्त्याने कीर्ती भगवान वाडेकर व वेदांती प्रवीण निकम या दोघी त्यांच्या (एमएच 12 टीएक्स 3462) दुचाकीहून जातेगाव बुद्रुक येथील शाळेमध्ये चाललेल्या होत्या. करंदी-जातेगाव रस्त्याने वर्पे वस्ती येथे (एमएच 12 – 3662) ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालक वेडेवाकड्या पद्धतीने ट्रॅक्टर चालवत असताना शाळेमध्ये जाणाऱ्या मुली ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीचा शाळकरी मुलीच्या दुचाकीला धक्का लागला.
यावेळी कीर्ती वाडेकर व वेदांती निकम या दोघी खाली पडल्या त्याच वेळी ऊसाने भरलेल्या ट्रॉलीचे चाक कीर्ती वाडेकर हिच्या छातीवरून तसेच वेदांती निकम हिच्या दोन्ही पायांवरून गेले. तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.