संचालक मंडळाच्या बैठकीत दोघांचीही बिनविरोध निवड
निवृत्तीनगर- जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सत्यशील सोपानशेठ शेरकर यांची तर उपाध्यक्षपदी अशोक भगवंत घोलप यांची बिनविरोध निवड करण्यात आली, अशी माहिती अध्यासी अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर-2 च्या स्नेहा जोशी यांनी दिली.
श्री विघ्नहर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत अध्यक्ष शेरकर यांच्या नेतृत्वाखालील शिवनेर पॅनलचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर 16 उमेदवार मोठ्या फरकाच्या मताधिक्क्याने विजयी झालेले आहेत. गुरूवारी (दि. 20) सकाळी 11 वाजता निवृत्तीनगर येथील कारखाना सभागृहामध्ये पदाधिकारी निवडीकरिता विघ्नहर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांची अध्यासी अधिकारी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. श्रीखंडे यांच्या उपस्थितीत बैठक बोलाविण्यात आली होती.
विघ्नहरच्या अध्यक्षपदाकरीता शेरकर यांचा एकमेव अर्ज दाखल होता. अध्यक्षपदी शेरकर यांची निवड व्हावी, अशी सूचना संचालिका निलम तांबे यांनी मांडली. त्यास अनुमोदन संचालक नामदेव थोरात यांनी दिले. एकच अर्ज आल्याने अध्यक्षपदी शेरकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी यांनी जाहीर केले. त्यानंतर उपाध्यक्षपदीही अशोक घोलप यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. उपाध्यक्षपदी घोलप यांची निवड व्हावी, अशी सूचना संचालक संजय पानसरे यांनी मांडली. त्यास अनुमोदन संचालक संतोष खैरे यांनी दिले.
उपाध्यक्षपदाकरिता एकच अर्ज असल्याने घोलप यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. निवडीनंतर अध्यक्ष शेरकर व उपाध्यक्ष घोलप यांचे उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी विघ्नहर कारखान्याचे आजी-माजी संचालक, सभासद, ऊस उत्पादक, अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी संजय पानसरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
- सभासद, ऊस उत्पादकांनी मी व माझ्या सहकारी संचालकांवर विश्वास दाखवून शेतकरीवर्गाची काळजी घेणारे संचालक मंडळ निवडून दिले, त्याबद्दल सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरीवर्गाचे आभार मानतो. कारखान्याचे सभासद हेच कारखान्याचे मालक आहेत. आम्ही निवडून आलेले संचालक हे सर्वांचे विश्वस्त म्हणून पारदर्शकपणे कामकाज करणार आहोत. स्व. निवृत्तीशेठ यांनी भूषविलेल्या खुर्चीचा मानसन्मान ठेवून शेतकरी हिताचे कामकाज केले जाईल.
– सत्यशील शेरकर, अध्यक्ष, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, निवृत्तीनगर.