मुंबई – कविराज भूषण यांनी रचलेली अप्रतिम रचना “इंद्रजिमी जृंभ पर’ ही काव्यरचना कानावर पडताच अंगाअंगात स्फुर्ति संचारते. “इंद्रजिमी जृंभ पर बाडव सअंभ पर रावण सदंभ पर रघुकुलराज है।तेज तमअंस पर कन्ह जिमि कंस पर त्यो म्लेंछ बंस पर शेर शिवराज है।’ या अजरामर स्तुतीकाव्याचा इथं उल्लेख करण्यामागं एक विशेष कारण आहे. या काव्यातील “शेर शिवराज’ हे ध्रुवपद आता एका मोठ्या मराठी सिनेमाचं शीर्षक बनलं आहे.
फर्जंद, फत्तेशिकस्त आणि नुकताच प्रदर्शित झालेला पावनखिंड’च्या यशस्वी घोडदौडनंतर दिग्पाल लांजेकर आता आपला आगामी ‘शेर शिवराज’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले होते. तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि एक दमदार टिझर रिलीज करण्यात आला होता. तर, आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई मूव्ही स्टुडिओ आणि यूएफओ मुव्हीज यांच्याबरोबरच मेटावूडच्या सहकार्याने मेटाव्हर्समध्ये शेर शिवराज चित्रपटाचा ट्रेलर आणला, ज्यामुळे मेटाव्हर्सद्वारे लाँच होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला.
शिवकालीन इतिहासातील अफझलखान वध ही घटना युद्धाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याच अफझलखानाचा वध हा केवळ शत्रूचा वध नव्हता, तर शिवाजी महाराजांनी त्यात उत्तम युद्धतंत्र आणि मानसिक दबावतंत्राचा अंतर्भाव केला होता. याच युद्धनीतीवर “शेर शिवराज” हा चित्रपट आधारित आहे.