आशासेविका सुमन ढेबे यांचे अनोखे कार्य
वेल्हे-अतिदुर्गम वेल्हे तालुक्यातील आशासेविका सुमन ढेबे ग्रामस्थांच्या आरोग्य तपासण्यासाठी गाव वाड्यावरच्या डोंगर रांगा तुडवत आहे. सुमन रामचंद्र ढेबे या सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या (आशा) कार्यक्रमांतर्गत वेल्हे तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातून 10 कि. मी. रोजचा पायी प्रवास करत आहे. त्यांच्या या कामाचे खासदार सुप्रिया सुळे यांनीही कौतुक केले आहे.
करोना व्हायरसचा उद्रेक झाल्यापासून, वैद्यकीय मदत देणे आणि 1000 गावकऱ्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे हे त्यांचे कार्य आहे. ढेबे ह्या वेल्हे तालुक्यापासून 49 किमी अंतरावर असलेल्या पोळे गावातील डोंगर माथ्यावर असणाऱ्या धनगरवाड्यावर राहतात. हा भाग डोंगराळ, निसरडा आहे. अशा भागात वाघिणीसारखी फिरून उन्हाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्य तपासणी करत आहे. पोळे, माणगाव, निवांगुनवाडी या गावांत त्यांचे चे कार्य असून ही गावे व गावातील वस्त्या डोंगरावर वेगवेगळ्या ठिकाणी वसलेली आहेत. येथे वाहने सुद्धा पोहोचत नाही म्हणून दररोज किमान 10 किमी पायी चालत जावे लागते. या प्रवासात व लोकांच्या तपासण्या करण्यात संपूर्ण दिवस जातो.
- लोकांसाठी डॉक्टरीनबाईच
ही आणीबाणीची परिस्थिती असल्याने, मी आपला दिवस पहाटे सुरू करते. रोजची कामे व स्वयंपाक पूर्ण केल्यावर सकाळी 8 वाजता घर सोडते. दिवसा शक्य तितक्या घरांना भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले. ढेबे ह्या आठ वर्षांपासून आशा वर्कर म्हणून सेवा करत आहेत. जवळच्या गावात दांडगा संपर्क स्थापित केला असल्याने त्यांना ग्रामस्थ डॉक्टरीनबाई म्हणतात.