हुशारीने ती वाचली एचआयव्हीपासून

पुणे : तिचे आयटी क्षेत्रातील अभियंता तरूणाशी लग्न झाले…पूजेच्या दिवशी फ्रिजमध्ये कसले तरी औषध तिला दिसले…कसले औषध असेल, याचा विचार तिने केला… ते औषध तपासणीसाठी दिले…ते एचआयव्ही झालेल्या रुग्णाचे औषध असल्याचे उघड झाले…तिच्या पायाखालची जमिनच सरकली…पतीने आजार लपविल्याचे तिच्या लक्षात आले…तिने माहेर गाठले..घटस्फोटासाठी अर्ज केला. समुपदेशानंतर त्याने तिला घटस्फोट देण्याचे मान्य केले. त्यासह लग्नाचा आलेला खर्च म्हणून पाच लाख रुपयेही दिले. नर्स असलेली ती मात्र हुशारीने एचआयव्हीपासून बचावली. तिने सुटकेचा निश्‍वास टाकला.

माधव (वय 28) आणि माधवी (वय 26) (नावे बदलली आहेत) अशी त्यांची नावे आहेत. तिने नर्सिंगचा कोर्स केला असून, ती आता नर्स म्हणून नोकरी करत आहे. तो संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहे. दोघांचे ऍरेंज मॅरेज झाले. पूजा झाल्यानंतर ते हनिमुनलाही जाणार होते. मात्र, पूजेच्या दिवशी तिला फ्रिजमध्ये एक औषध दिसले. तिने उत्सुकतेने तपासणीसाठी दिले. ते एचआयव्ही रुग्णाचे असल्याचे तपासणीत सांगण्यात आले. त्यावेळी तिने एचआयव्ही आहे का, अशी विचारणा त्याला केली. त्याने नसल्याचे सांगितले. तिने त्याला तपासणीसाठी चाचण्या करण्यास सांगितले. त्याने त्यास नकार दिला. मात्र, तिने धरलेल्या हट्टामुळे अखेर तो चाचणी करण्यास तयार झाला. दोघांचीही चाचणी करण्यात आली. त्यामध्ये त्याला एचआयव्ही असल्याचे निष्पन्न झाले.

तर तिला मात्र कोणता आजार नव्हता. औषधाचा संशय आल्यानंतर ती माहेरी निघून गेली होती. त्यामुळे ते एकत्र आले नव्हते. त्यामुळे ती बचावली. तिने घटस्फोटासाठी अर्ज केला. अर्जानंतर काही कालवधीनंतर हे प्रकरण समुपदेशक ऍड. अतुल गुंजाळ यांच्याकडे समुपदेशानासाठी पाठविण्यात आले. त्याने लग्नापूर्वी एचआयव्ही असल्याचे मान्य केले नाही. मात्र, समुपदेशन केल्यानंतर घटस्फोट देण्याचे मान्य केले. वैद्यकीय रिपोर्ट पाहून समुपदेशनानंतर काही कालावधीच न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजुर केला.

लग्नानंतर घटस्फोट मिळण्यास तिला सुमारे सहा महिन्याचा कालावधी लागला. याविषयी समुपदेशक ऍड. अतुल गुंजाळ म्हणाले, लग्न जमविताना जन्म पत्रिका पाहिली जाते. मात्र, बदललेल्या परिस्थितीत आता पत्रिका पाहण्यापेक्षा दोघांचे रक्त तपासणी काळाची गरज आहे. अन्यथा दोघाचे आयुष्य उध्दवस्त होण्याची शक्‍यता असते. इथे नर्स असलेल्या विवाहितेने हुशारी दाखविल्याने ती वाचली. त्यानंतरच्या लढाईसाठी तिला आई-वडिलांनी मदत केली.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.