सविंदणे – वडिलांचे छत्र लहानपणीच हरपलेले.. घरातील कर्ता पुरुष गेल्याने घरची खूप हलाखीची परिस्थिती, गरीबीमुळे आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायची. पाठीमागे लहान भाऊ, राहायला नीट घरही नाही. झोपडीवजा घरात राहून हलाखीच्या परिस्थितीवर जिद्दीने मात करत सविंदणे येथील अश्विनी हनुमंत नरवडे या मुलीने चांगले शिक्षण घेत कुठलेही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत तिची मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारीपदी नुकतीच निवड झाली आहे.
गरीब परिस्थितीत इयत्ता 1ली ते 4थी शिक्षण जिल्हा परिषद शाळा सविंदणे, 5वी ते 10वी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणे, 11वी 12वी लोणीमध्ये कला शाखेतून इ. स. प. महाविद्यालयातून पूर्ण केले. तिने 2014 ते 2018 या काळात एमपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. 2016 व 2017 मध्ये पूर्व परीक्षा पास झाली. पण तिला अंतिम यशाने हुलकावणी दिली. नाराज न होता जिद्दीने तिने पुन्हा प्रयत्न करून 2018मध्ये परीक्षेत पास होऊन नगरपरिषदेत कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदावर शिरूर नगरपरिषद या ठिकाणी नियुक्ती झाली. शिरुर नगरपरिषदेत काम करत असताना तिने पुन्हा 2018ची मुख्य परीक्षा दिली. त्यातून तिला अंतिम यश मिळाले व मंत्रालयात सहायक कक्ष आधिकारी म्हणून निवड झाली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अधिकारी झाल्यामुळे तिच्यावर शिरूर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.