आता मतदारसंघाचे वाटोळे करणार का?

आ. मकरंद पाटील यांची मदन भोसलेंवर परखड टीका

वाई – दोन वर्षे शेतकरी सभासदांना उसाची बिलं नाहीत, कामगारांना अकरा महिने पगार नाहीत. कोट्यवधीच्या कर्जामुळे कारखाना दिवाळखोरीत गेला आहे, केवळ सत्ता लालसेपोटी जे आपल्या आईला विसरले ते गॉगल घालून चमकोगिरी करणारे नेते पाच वर्षे कुठे होते? कारखान्याचे वाटोळे केले. आता मतदारसंघाचे करणार का? असा सवाल करत आ. मकरंद पाटील यांनी माजी आमदार मदन भोसले यांच्यावर प्रखर टीका केली. तसेच विकासाची चर्चा करण्यासाठी मदन भोसलेंना समोरासमोर येण्याचे आव्हानही आ. पाटील यांनी केले. बावधन व बावधन गणातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा तसेच राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

आ. मकरंद पाटील म्हणाले, पक्ष, निष्ठा, तत्त्व याला तिलांजली देत अनेक जण पक्ष सोडून जात असल्याचे सांगत आ. पाटील यांनी भोसले यांच्या भाजप प्रवेशावर कडाडून टीका केली. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या या भाजपवासी नेत्यांने पाच वर्षे आमदार असताना काय दिवे लावले? माझे आजही त्याना जाहीर आवाहन आहे त्यांनी एक कोटी व त्यापेक्षा अधिक एखादं मोठं काम
केलं आहे का? ते सांगावं. मी प्रत्येक गावात कोट्यवधीची कामे केली. बावधन गणात एका वर्षात चोवीस कोटींची कामे केली. पश्‍चिम भागाला वरदान ठरणारी “जललक्ष्मी’ तर पूर्व भागाला
वरदान ठरणारी कवठे-केंजळ योजना मीच मार्गी लावली.

नागेवाडी धरणाच्या कालव्याचा प्रश्‍नही मीच मार्गी लावला. या महाशयांनी काय केलं? खरंच यांनी काम केली असती तर यांना मतदारांनी तीन वेळा पराभूत केलं असतं का? असा प्रश्‍न पाटील यांनी केला. अनेक तांत्रिक अडचणी असताना देखील शासनदरबारी पाठपुरावा करून शिवस्मारकाच्या कामांसाठी निधी उपलब्ध केला. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अरूणादेवी पिसाळ होत्या.

यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. हेमलता ननावरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रतापराव पवार, सूतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, जिल्हा परिषद सदस्या सौ. शारदा ननावरे, सभापती सौ. रजनी भोसले, उपसभापती अनिल जगताप, बाजार समितीचे चेअरमन लक्ष्मणराव पिसाळ, खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवाजीराव पिसाळ, माजी सभापती दिलीप पिसाळ, माजी उपसभापती मदन भोसले, महादेव मसकर, शंकरराव शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे कार्याध्यक्ष संजय लोळे, नगरसेवक दीपक ओसवाल, प्रदीप चोरगे, चरण गायकवाड, भारत खामकर, राजेश गुरव, नितीन मांढरे आदी उपस्थित होते.

सौ. अरुणादेवी पिसाळ, शशिकांत पिसाळ, प्रतापराव पवार, दिलीप पिसाळ, सरपंच पप्पू भोसले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. मदन भोसले यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच तानाजी कचरे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. कार्यक्रमास यशवंत जमदाडे, सतीश मांढरे, सौ. सुनीता कांबळे, सौ. संगीता चव्हाण, अंकुश कुंभार, रमेश गायकवाड, विलास मांढरे, ऍड. विजयसिंह पिसाळ, वसंतराव पिसाळ, हरिदास राजपुरे, लक्षीमन पिसाळ, आनंद चिरगुटे, मनिष भंडारे, सुनील घोलप, राजू कदम, अविनाश गाढवे, सदाशिव ननावरे, सतीश कांबळे, राजेंद्र चव्हाण आदींसह बावधन परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

चौथ्यांदाही मतदार घरी बसवतील

भव्य स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात असताना हे महाशय गॉगल घालून त्याठिकाणी मंत्र्यांना घेऊन फोटो सेशन करतात यासारख्या दुसरा करंटेपणा नाही. दुसऱ्याच्या पोराला आपलं पोरं म्हणणाऱ्या अशा वृत्तीची किव करावशी वाटते, अशी बोचरी टीका पाटील यांनी केली.

ज्या कॉंग्रेसने यांना भरभरून दिलं, त्या कॉंग्रेसला माझी आई असल्याचे सांगणारे आज दुसऱ्याच्या आईला आपली आई कसे म्हणतात? असा प्रश्‍न करत आ. पाटील म्हणाले, त्यांनी कोणत्याही पक्षातून निवडणूक लढवावी, त्यांचा पराभव अटळ आहे. मतदारसंघात एक दिवस पर्यटनाला बाहेर पडणाऱ्यांना मतदार चौथ्यांदा घरी बसवतील. त्यांच्याविषयी खूप बोलण्यासारख आहे. येत्या काळात ते मी जनतेसमोर मांडणार आहे, असेही ते म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)