नवी दिल्ली – कॉंग्रेस कार्यकारिणीने आज डॉ. शंकर दयाळ शर्मा यांची कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली. जून महिन्यात महासमितीचे अधिवेशन होईल. तोपर्यंत ते ही जबाबदारी सांभाळतील. कॉंग्रेस कार्यकारिणीची आज तातडीची सभा झाली. ही सभा अध्यक्षांच्या निवडीसाठीच होती. महासमितीच्या जूनच्या बैठकीतही शर्मा यांचीच निवड होईल व खुल्या अधिवेशनापर्यंत ते अध्यक्ष राहतील, असे सांगण्यात आले.
अविकसित भागाकडे शासनाचे दुर्लक्ष
पुणे – “मराठवाडा-कोंकण-विदर्भ’ या महाराष्ट्रातील अविकसित प्रदेशाकडे शासन, नियोजनकर्ते फार उपेक्षेने पाहात आहेत आणि मुंबई, पुणे यासारख्या अत्यंत विकसित प्रदेशातच उद्योगधंदे, शेती इ. आर्थिक विकासाच्या आवश्यक बाबीकडे जास्त लक्ष पुरविले जाते हा अन्याय आहे. प्रादेशिक समतोल हा केवळ तात्त्विक प्रश्न नसून व्यावहारिकदृष्ट्याही मोठा गहन प्रश्न आहे, असे उद्गार समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांनी काढले.
तयार कपड्यावरील
कराचा फटका! अनेक कारखाने बंद झाले
मुंबई – तयार कपड्यावर दहा टक्के जादा कर बसविल्यामुळे कपडे तयार करणारे छोटे कारखाने बंद पडले आहेत. तर मध्यम प्रतीच्या कारखान्यांनी आपले उत्पादन कमी केले आहे. गेल्या आठवड्यात या व्यावसायिकांचे शिष्टमंडळ ना. यशवंतराव चव्हाण यांना भेटले व जादा कर रद्द करावा, अशी मागणी केली.
पाक रुपयाचे अवमूल्यन
नवी दिल्ली – पाकिस्तानी रुपयाचे अवमूल्यन करण्यात आल्याची घोषणा आज पाक सरकारने केली. पाकिस्तानी रुपयाची किंमत यापुढे एका अमेरिकन डॉलरला 11 रुपये असा राहील असे पाक रेडिओने सांगितले. यापूर्वी एक डॉलरबरोबर 4-75 पाक रुपये अशी किंमत होती. अवमूल्यन ताबडतोब अमलात येणार आहे. अवमूल्यनाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला.