Share Market 9 April – आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने सर्वकालीन उच्चांक 75,124 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने 22,765 चा सर्वकालीन उच्चांक गाठला. मात्र नंतर बर्याच गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्यामुळे निर्देशांकांनाही उच्चांकी पातळी कायम राखता आली नाही. बाजार बंद होतांना सेन्सेक्स कालच्या तुलनेत 58 अंकांनी कमी होऊन 74,683 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 23 अंकांनी म्हणजे 0.10 टक्क्यांनी कमी होऊन 22,642 अंकावर बंद झाला.
टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली तर आयसीआयसीआय बँक, इन्फोसीस, बजाज फिनसर्व, टाटा स्टील, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, नेस्ले, महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
जपान, चीन, हाँगकाँगमधील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. तर दक्षिण कोरियातील निर्देशांक कमी झाले होते. युरोपमध्ये वातावरण नकारात्मक होते तर अमेरिकेतील वातावरण संमिश्र होते.
जिओजीत वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, उद्या अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे काही गुंतवणूकदारांनी नफेखोरी केली. अमेरिकेत महागाई वाढलेली राहिली तर व्याजदर कपातीची शक्यता कमी होणार आहे. दरम्यानच्या काळात अमेरिकेतील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा परचेसिंग मॅनेजर इंडेक्स वाढला आहे. ही समाधानाची बाब आहे. सोमवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 684 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. दरम्यान खनिज तेलाचे जर अजूनही 90 डॉलरच्या वर आहेत. हा भारतीय गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय समजला जातो.
निवडणुकीमुळे पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेवर येईल, अशी आशा बाजारपेठेत असून, त्यामुळे तेजी दिसून येत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी गेल्या सत्रात शेअर बाजारात 1,659.27 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, त्याचा बाजारातील भावावर सकारात्मक परिणाम झाला आहे. बाजाराला जूनमध्ये अमेरीकेत व्याजदरात कपातीची अपेक्षा आहे.