पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील (Market Yard) श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळाचा श्री शारदा गजानन (Sharda Gajanan) विसर्जन मिरवणुकीत यंदा गोवर्धन लीला रथात विराजमान होणार आहे. गुरूवारी (दि. 28) दुपारी साडे बाराच्या सुमारास श्री शारदा गजाननाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होईल.
रथासाठी एक हजार किलो सुट्टी व 15 हजार फुलांच्या गड्ड्यांचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सागर भोसले यांनी दिली. मंडळाच्या वतीने गोवर्धन लीला रथ साकारण्यात आला आहे.
रथासाठी 500 किलो शेवंती, 30 किलो गुलटोप, 80 किलो पिवळी शेवंती, 40 किलो पर्पल शेवंती, 50 किलो गोल्डन शेवंती, 200 किलो झेंडू यासह विविध रंगी गुलाबाचे सहा हजार नग, चार हजार कार्नेशियन फुले, 300 गड्डी कामिनी, 500 गड्डी आर्किड, लाल गुलाबाचे दहा हजार नग व 50 हजार गुलाबी गुलाबांचा वापर करण्यात आला आहे.
श्रीकृष्णाच्या लीला या संकल्पनेवर विसर्जन रथ आधारित आहे. रथ 19 फुट लांब तर 16 फुट उंच असणार आहे. त्यावर श्रीकृष्णासह गायी, कमळाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
गुरूवारी टिळक रस्त्याने मंडळ मार्गस्थ होणार असून मिरवणूकीच्या अग्रभागी नगारा वादन असणार आहे. त्यामागे स्वरांजली बँड असणार आहे. तसेच नादब्रम्ह व कलावंत ढोल ताशा पथक मिरवणुकीत सहभागी होतील.
यावेळी, संस्थापक अध्यक्ष गणेश घुले, कार्याध्यक्ष प्रसाद गव्हाणे, सचिव राजू पठारे, व्यवस्थापक राजेश मोहोळ, विशाल केकाणे, शुभम हिंगे, केतन कांदे, बबलु बागवान, शैलेश जितकर आदी उपस्थित होते.