पुणे – “श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक सायंकाळी 07:00 वाजता निघणार आहे. यासाठी आकर्षक “मयूरपंख रथ’ तयार करण्यात आला आहे. ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी याबाबत माहिती दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाची जल्लोषात आणि शानदार विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. दिवसभरात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर सायंकाळी 07:00 वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात होईल.
या मिरवणुकीसाठी आकर्षक पद्धतीने मयूरपंख रथ सजविण्यात आला असून, रथासमोर पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशा पथके असणार आहेत. यामध्ये समर्थ पथक, रमणबाग पथक, श्रीराम पथक या तीन पथकांचा समावेश आहे. मिरवणुकीत पारंपरिक मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार असल्याची माहिती बालन यांनी दिली.
पुण्यातील बाप्पाची विसर्जन मिरवणूक हे सर्वच गणेश भक्तांचे प्रमुख आकर्षण असते. त्यामुळे ती मिरवणूक देखणी, आकर्षक आणि दिमाखदार कशा प्रकारे होईल, असा सर्वच गणेश मंडळांचा प्रयत्न असतो. आमचाही असाच प्रयत्न आहे. अधिकाधिक गणेश भक्तांनी या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन आनंद घ्यावा आणि बाप्पाला भक्तीभावाने निरोप द्यावा. – पुनीत बालन, विश्वस्त आणि उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट