बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बारामती तालुकाध्यक्षपदी येथील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. एस. एन. जगताप यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी अॅड. जगताप यांना नियुक्तीचे पत्र दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरही बारामती शहरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था कायम होती. शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीने बारामतीमध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
बारामती तालुक्यात शरद पवार गटाच्या कार्यकारिणीच्या निवडीचे सत्र सुरु झाल्यामुळे राजकीय वातावरण आता वेगळ्या दिशेने जाणार ही बाब स्पष्ट झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जात सत्तेत प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या भूमिकेला विरोध केला होता. त्यानंतर आता बारामतीत शरद पवार यांच्यावतीने पक्षीय बांधणी सुरु करण्यात आली आहे.
अॅड. एस. एन. जगताप हे बारामती तालुक्यात ज्येष्ठ विधीज्ञ व पवार कुटुंबियांचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. आज त्यांनी अधिकृतपणे शरद पवार यांच्या गटात सहभागी होण्याची भूमिका घेतली आहे. बारामतीत आता राष्ट्रवादीचे दोन गट कार्यरत राहणार हे आज स्पष्ट झाले आहे.
अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर बारामतीत त्याचे व्यापक स्वागत झाले होते. अजित पवार यांचा भव्य नागरी सत्कारही झाला होता. त्यानंतर अनेक राजकीय चर्चा झाल्या, मात्र आता शरद पवार गटाच्या वतीने पक्षीय बांधणी सुरु झाल्यामुळे बारामतीतही राजकीय समीकरणे वेगळी होणार हे स्पष्ट झाले आहे.
खरच दोन गट पडलेले आहेत का? या बाबतही चर्चा अनेक स्तरावर सुरु होत्या. आजच्या अॅड. एस. एन. जगताप यांच्या नियुक्तीने बारामतीत राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाल्याचे उघड झाले आहे. आगामी सर्वच निवडणूकांत हे दोन गट परस्परांसमोर उभे ठाकणार की आणखी काही समीकरणे बदलणार या बाबतही चर्चा सुरु झाली आहे.