मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतची माहिती स्वतः शरद पवार यांनी दिली आहे.लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले. संजय राऊत यांनी देखील याबाबत एक ट्विट केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात,”एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.शरद पवार यांनी तेच केले आहे.जनतेच्या रेट्यामुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला.शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत”.
या निर्णयानंतर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले “मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहे. कुठं थांबायचं हे मला माहिती आहे. त्यासाठी मी जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची लवकरच बैठक बोलवणार आहे.” तसेच संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितले.
एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.शरद पवार यांनी तेच केले आहे.
जनतेच्या रेट्या मुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला.शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि… pic.twitter.com/YwVVgrrWiN— Sanjay Raut (@rautsanjay61) May 2, 2023
शरद पवारांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ च्या सुधारीत आवृत्तीचे आज प्रकाशन झाले यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यानंतर कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत पवारांना हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली.