नाशिक – शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह 9 नेत्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. या राजकीय घडामोडीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार शनिवार, 8 जुलै रोजी नाशिकच्या येवला येथे जाहीर सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोब गेलेल्या छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यातच पवारांची ही पहिली सभा होणार आहे.
भुजबळ यांना आव्हान देण्यासाठी ही सभा होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यासाठी ठिकठिकाणी शरद पवार यांच्या शक्तिप्रदर्शनासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये भुजबळ यांच्याकडूनही शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. मात्र आता शरद पवार बंडखोर नेत्यांबाबत काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सभेसाठी जय्यत तयारी
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवारांची ही पहिलीच सभा आहे. दुपारी 4 वाजता येवला बाजार समितीच्या पटांगणात या सभेला सुरूवात होणार आहे. येवला येथील बाजार समितीच्या बंदिस्त शेडमध्ये सभेसाठी व्यासपीठ उभारणी करण्यात आली आहे. 150 बाय 200 फूट आकार असलेल्या या शेडमध्ये चार फूट उंचीचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. पत्र्याचे शेड असल्याने पावसातही सभा घेता येणार आहे. यासाठी पाच हजार लोकांच्या बसण्याची सोय करण्यात आली आहे.