महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार आलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस नागपूरला पोहचताच त्यांचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. मात्र यावेळी फडणविसांच्या स्वागतासाठी झळकलेल्या फ्लेक्सवर भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो गायब असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता पवारांनी यावर थोडक्यात भाष्य केलं.
महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्यावेळी सगळ्यांना वाटलं होत मुख्यमंत्री पदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडेल. परंतु अचानक ठरलेल्या कार्यक्रमात बदल करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. केंद्रीय आदेशामुळे असे करण्यात आल्याचे सर्वांनी पाहिले. यामुळेच फडणवीस यांचे कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी नागपुरातील फडणवीस त्यांच्या स्वागताच्या फ्लेक्सवरून अमित शहांचा फोटो गायब केल्याची जोरदार चर्चा सुरु झाली.
शरद पवार रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना या फ्लेक्सबाजीबाबत प्रश्न विचारला असता पवार यांनी याबाबत थेट भाष्य करण टाळल. त्याच्यात कोणाचा फोटो होता, कोणाचा नव्हता हे काय मी बघायचं का ? असा सवालही पवारांनी यावेळी उपस्थित केला आणि ठीक आहे असेल नसेल काही असं म्हणत पवार पुढील प्रश्नाकडे वळले.