भाजपाविरोधात रणनीती आखण्यासाठी शरद पवार दिल्लीला रवाना; २३ जूनपर्यंत राजधानीत असणार मुक्काम

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून  मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणारे शरद पवार रविवारी दिल्लीसाठी रवाना झाले. तर  २३ जूनपर्यंत राजधानीमध्येच त्यांचा मुक्काम असणार आहे.

शरद पवार यावेळी देशातील राजकीय स्थितीवर तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणत रणनीती आखण्यासंबंधी विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता  असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी पक्षाने शरद पवार २३ जूनपर्यंत दिल्लीत असतील याला दुजोरा दिला आहे, मात्र त्यांनी इतर कोणतीही माहिती देण्यास नकार दिल्याचे सांगितले आहे.

शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी बोलताना राष्ट्रवादी शिवसेनेला बाजूला करुन भाजपासोबत हातमिळवणी करण्याच्या शक्यता फेटाळल्या होत्या. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार सरकार पाच वर्षे टिकेल, काम करेल, नुसतेच पाच वर्षे नाही तर आगामी लोकसभेला व विधानसभेला अधिक जोमाने एकत्रित काम करेल असे सूचक विधान केले  होते.

विशेष म्हणजे यानंतर शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात भेट झाली होती. प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची भेट घेऊन तब्बल तीन तास चर्चा केली होती. त्यावरून विविध तर्क वितर्कांना उधाण आले असताना राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी देशातील राजकीय परिस्थितीबाबत ही भेट झाल्याचे स्पष्ट केले होते.

देशात भाजपाच्या विरोधात सशक्त पर्याय उभा करण्याची राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची योजना असून, त्यादृष्टीने राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं होतं. “देशात बिगर भाजपा पक्षांचा पर्याय निर्माण करण्याची आवश्यकता शरद पवार यांनी वारंवार व्यक्त केली आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वीही पवारांनी तसे मतप्रदर्शन केलं होतं. भाजपाला सशक्त पर्याय उभा राहावा हीच शरद पवार यांची योजना आहे. यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असल्याचं,” मलिक यांनी सांगितले  होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.