पुणे – भाजपचे नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे 29 मार्च रोजी निधन झाले. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर वैकुंठभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बापट यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात आला. मात्र असे असतानाच पुण्यात निर्लज्जपणाचा कळस पाहायला मिळाला.
गिरीश बापट यांचे निधन होऊन अवघे तीन दिवस झाले असतानाच पुण्यात भावी खासदाराचे बॅनर झळकले आहेत. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे पुण्यात ‘भावी खासदार’ असा उल्लेख असणारे बॅनर लागले आहेत. मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त यानिमित्त हे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र यावरून मुळीक यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
दरम्यान, बापट यांच्या अकाली निधनामुळे पुण्यातील लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. मात्र बापट जाऊन तीन दिवसच झाले आणि भाजपमधील इच्छुकांनी त्यांच्या जागेवर दावा सांगण्यास सुरुवात केली. यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी टीका केली आहे.
भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यू ची वाट पाहत होते का ? बापट साहेबांच्या आत्म्याला जरा शांती तरी लाभू दयाची होती.त्यांना जाऊन आज तीनच दिवस झाले आहेत भावी खासदाचे बॅनर पण लावले.जनाची नाही मनाची तरी ठेवा. pic.twitter.com/pkwb21jl5I
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) March 31, 2023
सुरज चव्हाण यांनी ट्वीट करत लिहिले की, ‘भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत होते का? बापट साहेबांच्या आत्म्याला जरा शांती तरी लाभू द्याची होती. त्यांना जाऊन आज तीनच दिवस झाले आहेत भावी खासदाचे बॅनर पण लावले. जनाची नाही मनाची तरी ठेवा.’