नाशिक – “छत्रपतींनी जी मंदिरे वाचवली त्या छत्रपतींना शिकविण्याचे धाडस करु नका,’ अशा शब्दांत संयोगिताराजे छत्रपती यांनी काळाराम मंदीरातील पुराणोक्तपद्धतीने मंत्र म्हणणाऱ्या महंतांविरुद्ध आपला संताप व्यक्त केला. श्रीराम नवमीच्या निमित्ताने कोल्हापूर गादीचे संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी असणाऱ्या संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली.
यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली. महंतांनी पूजा पुराणोक्तपद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. त्यास महंतांनी विरोध केल्याने संयोगिताराजे चांगल्याच संतापल्याचे पहायला मिळाले. हा सगळा प्रकार संयोगिताराजे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
यावर आता सर्व स्तरावरून प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी म्हणाले,’नाशिक येथील काळाराम मंदिरात छत्रपती घराण्याच्या वारसदार संयोगीताराजे छत्रपती यांना वेदोक्त प्रकरणाचा अनुभव आला. १८९९ साली शाहू महाराजांनाही पंचगंगेच्या घाटावर कार्तिक मासाच्या वेळी अशा प्रसंगाचा अनुभव आला होता. त्यांना अपमानाचा प्रसंग सहन करावा लागला. काळाराम मंदिरातील महंतांनी संयोगीताराजे यांना रामरक्षा स्तोत्र आणि वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखलं किंवा तुम्हाला तो अधिकार नाही.
ते पुढे म्हणाले, ‘आताच्या काळात हे महंत आणि ब्रह्मवृंद असे उन्मत होत असतील, तर अशा महंतांवर २४ तासांच्या आत कारवाई करावी. कारण संयोगीताराजे यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. छत्रपतींच्या गादीचा अपमान आहे. त्यामुळे बहुजन समाजाचे घटक म्हणून आम्ही तो कधीही सहन करणार नाही.’ असं सांगितल.