शीला दीक्षित यांना साश्रु नयनांनी अखेरचा निरोप

नवी दिल्ली – दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांना आज साश्रु नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. सोसाट्याचा वारा आणि पावसामध्येही शीला दीक्षित यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी त्यांचे निकटवर्तीय, सहकरी, कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. निगमबोध घाट येथे पूर्ण शासकीय इतमामामध्ये शीला दीक्षित यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. युपीए अध्य्क्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी वढेरा यांच्यसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्य्मंत्री मनिष सिसोदिया आणि गृहमंत्री सत्येंद्र जैन हे देखील याप्रसंगी उपस्थित होते. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी याप्रसंगी जमा झाली होती.

शीला दीक्षित या जवळच्या स्नेही आणि वडील भगिनीसमान होत्या. त्यांच्या निधनामुळे कॉंग्रेस पक्षाचे अपरिमित नुकसान झाले आहे, अशा शब्दात सोनिया गांधी यांनी दीक्षित यांच्याबाबतच्या आपल्या भावना व्यक्‍त केल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही दीक्षित यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि आदरांजली वाहिली.

शीला दीक्षित यांचे पार्थिव कॉंग्रेस मुख्यालयामध्ये नेण्यात आले. तेथे पक्षाचे वरिष्ठ नेते मनमोहन सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि कमल नाथ यांनीही दीक्षित यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर दीक्षित यांचे पार्थिव दिल्ली प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये नेण्यात आले. निधनासमयी शीला दीक्षित यांच्यावर दिल्ली प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. दीक्षित यांच्या निकटवर्तीयांनी त्यांच्या 15 वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीतील आठवणींना उजाळा दिला.

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दीक्षित यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली होती. याप्रसंगी दिल्लीचे भाजप अध्यक्ष मनोज तिवारीही त्यांच्या समवेत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.