इस्लामाबाद- पाकिस्तान मुस्लिम लीगचे अध्यक्ष शाहबाझ शरीफ यांच्यावर प्रवास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी उत्तरदायित्व विभागाने केलेली याचिका आज पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे शाहबाझ शरीफ यांना अंशतः दिलासा मिळाला आहे.
शाहबाझ शरीफ यांचे नाव प्रवास बंदीच्या यादीतून वगळण्याचा निर्णय लाहोर उच्च न्यायालयाने दिला होता. त्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी उत्तरदायित्व विभागाने सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती. मात्र शाहबाझ शरीफ हे न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यांच्या प्रवासावर निर्बंध घालण्याची गरज नाही. चारच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय पिठाने दिलेल्या निकालाचा दाखला सर्वोच्च न्यायालयाने दिला. शाहबाझ शरीफ यांना गेल्याच सोमवारी लाहोर उच्च न्यायालयाच्या आवारातून अटक करण्यात आली आहे.