नवी दिल्ली -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कर्नाटकात प्रचार करण्यास मनाई केली जावी, असे साकडे कॉंग्रेसने शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला घातले. भाजपचे दोन्ही नेते अल्पसंख्याक समाजविरोधी वक्तव्ये करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला.
अभिषेक सिंघवी, पवनकुमार बन्सल आणि मुकूल वासनिक या कॉंग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. भाजपला राजकीय लाभ मिळावा यासाठी शहा आणि योगी कर्नाटकमधील प्रचारात खोटी आणि जातीयवादी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्रचारबंदी घालण्यात यावी. निवडणूक आयोगाने तातडीने पाऊले उचलावीत, अशी मागणी त्या शिष्टमंडळाने केली. कर्नाटकमधील प्रचार तापू लागला आहे.
राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांविरोधातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींची तीव्रता वाढवली आहे. अशात निवडणूक आयोगाकडे जाऊन एकमेकांना शह-काटशह देण्याचे राजकारणही रंगू लागल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे यादिवशी मतदान होणार आहे. ती निवडणूक भाजप आणि कॉंग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे.