वाघोली – दहा वर्षांच्या मुलास केकचे आमिष दाखवून लैगिंक अत्याचार करणाऱ्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा आरोपी सात महिन्यांपासून फरार होता. त्यास लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.
हर्षल उर्फ सोनू हरिश्चंद्र शितोळे (वय 32, रा. न्हावी सांडस, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत 10 वर्षीय पीडित मुलाच्या आईने सात महिन्यांपूर्वी फिर्याद दिली होती.
फिर्यादी महिलेच्या 10 वर्षीय मुलास शितोळे याने 7 महिन्यांपूर्वी केकचे आमिष दाखवून लैंगिकअत्याचार केला असल्याचा प्रकार घडला होता. त्याचा गुन्हा लोणीकंद पोलिसांत दाखल होता.
गुन्हे शोध पथकाला गुन्ह्यातील आरोपी हा पिंपरी सांडस गावात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तात्काळ गुन्हे शोध पथकाने पिंपरी सांडस येथे सापळा रचून त्यास अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हणमंत पडळकर, बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाणे, संतोष मारकड, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, सुरज वळेकर यांनी केली.