पुणे – पुणे महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार देय असलेल्या रकमेपैकी 50 हजार रुपये उचल म्हणून देण्यात यावेत, असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
पुणे कामगार युनियनचे अध्यक्ष उदय भट यांनी सातव्या वेतन आयोगानुसार देय असलेल्या रकमेपैकी 50 हजार रुपये उचल म्हणून देण्यात यावेत, अशी मागणी महापौर मोहोळ यांच्याकडे केली होती. युनियनच्या मागणीची तातडीने दखल घेत मोहोळ यांनी हे आदेश दिले आहेत.
पुणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येत आहे. परंतु सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी दरम्यानच्या काळातील देय रक्कम ही टप्प्याटप्प्याने देण्यात येत आहे. दरम्यान, युनियनने केलेल्या मागणीवर महापौरांनी आदेश दिले असताना यावर आता प्रशासन काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असले, तरी ही कार्यवाही तातडीने होण्याची मागणी केली जात आहे.