पुणे – पुणे ते चेन्नई, चेन्नई ते पुणे आणि पुणे ते गोवा या विमानांना तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने या मार्गावरील विमाने मार्गस्थ होण्यास दोन ते चार तासांचा उशीर झाला.
तांत्रिक कारणांमुळे स्पाइस जेट विमानाचे सुमारे 300 प्रवासी सोमवारी पहाटे पुणे विमानतळावर अडकले. स्पाइसजेट एसजी 423 हे विमान पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी पुण्यातून सुटून 4 वाजून 30 मिनिटांनी चेन्नईला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात हे विमान 6 वाजून 6 मिनिटांनी निघून 7 वाजून 43 मिनिटांनी चेन्नईत पोहचले.
तर, चेन्नईहून पुण्याकडे जाणारे एसजी- 530 विमान सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी चेन्नईहून सुटणार होते. परंतु ते सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी निघाले. ते 10 वाजून 58 मिनिटांनी पुण्यात पोहचले. या विमानाला तब्बल चार तास उशीर झाला. पुण्याहून गोव्याला जाणारे एसजी 516 हे विमान देखील 1 तास 40 मिनिटे उशिराने पोचले. प्रवाशांनी याबाबत ट्विटरवर नाराजी व्यक्त केली.