पुणे -महापालिकेकडून कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले तब्बल 7 जलतरण तलाव दुरूस्तीच्या कामांसाठी गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. या तलावांच्या दुरूस्तीसाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात आवश्यक असलेल्या निधीची तरतूदच केली जात नसल्याने हे तलाव बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर ओढावली आहे. दरम्यान, क्रीडा विभागाकडून 2023-24 च्या अंदाजपत्रकासाठी या दुरूस्तीच्या कामासाठी निधी मागण्यात आला असून हा निधी मिळाला तरच हे तलाव सुरू होण्याची चिन्हे आहेत.
नागरिकांसाठी महापालिकेने शहराच्या वेगवेगळया भागात 34 जलतरण तलाव बांधले आहेत. हे तलाव महापालिकेकडून चालविण्यासाठी ठेकेदारांना भाडेकराराने देण्यात येतात. तर तलावात येणाऱ्या नागरिकांसाठीचे शुल्क पालिकेकडून निश्चित केले जाते. तेच शुल्क आकारणे ठेकेदारांना बंधनकारक आहे. करोनाच्या साथीमुळे पालिकेचे हे जलतरण मार्च 2020 नंतर बंद करण्यात आले होते. तर त्यानंतर, मागील वर्षी अनेक ठेकेदारांनी करोनाचे कारण देत तलावाचे भाडेच भरले नव्हते. त्यानंतर अखेर पालिकेने यंदाच्या उन्हाळ्यासाठी 25 तलाव सुरू केले आहेत. तर 7 तलावांची अवस्था देखभाल दुरूस्ती अभावी खराब झालेली असून, त्यासाठी मोठा खर्च येणार असल्याने तलाव बंद आहेत.
या तलावांच्या दुरूस्तीसाठी आवश्यक असलेला निधी अंदाजपत्रकात उपलब्धच होत नसल्याने ते बंद ठेवण्यात आले आहेत. तर सिंहगड रस्ता येथील एका तलावाच्या निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाल्याने तो सुद्धा बंद होता. मात्र, प्रशासनाने तो चालविण्यास देण्याचा प्रस्ताव आयुक्तांसमोर ठेवला आहे. त्यामुळे, यंदाच्या उन्हाळ्यात जवळपास 26 जलतरण तलाव नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहेत.
हे तलाव यंदा बंदच राहणार
केशवराव ढेरे तलाव – येरवडा
विठ्ठलराव तुपे तलाव – हडपसर
स. नं 152 येथील तलाव- औंध
डॉ. अब्दुल कलाम जलतरण
तलाव – पाषाण
पांडूरंग कवडे तलाव
– घोरपडी गाव
खराडी स.नं 4/1/2
तलाव- खराडी
जलतरण तलाव – कोंढवा