एखाद्या खेळात एखादी गोष्ट प्रथमच घडते, तेव्हा तो विक्रम असतो. पुण्यातील स्पोर्टीट्युड ही एक क्रीडा व्यवस्थापनामधील संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक संचालक रोशन शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संस्थेने एका आश्चर्यकारक कामगिरीची कल्पना मांडली आणि हाती घेतली व त्यात यश प्राप्त करत सायकलिंगला थेट प्रक्षेपणाद्वारे घराघरात पोहोचवले.
27 व्या राष्ट्रीय रोड रेस सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत नुकतीच अनोखी कामगिरी नोंदवली गेली. पुण्याच्या जवळच्या धार्मिक नगरी असलेल्या शिर्डीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे प्रथमच सुरुवातीपासून अखेरपर्यंत थेट प्रसारण करण्यात आले होते. देशात अशा प्रकारच्या लांब पल्ल्याच्या कुठल्याही शर्यतीत यापूर्वी अखेरपर्यंत थेट प्रसारण करण्यात आले नव्हते. महाराष्ट्र सायकलिंग संघटनेच्या या कामगिरीबद्दल भारतीय सायकलिंग महासंघानेही कौतुक केले.
ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यापूर्वी रोशन आणि त्याच्या संघासमोर सायकलिंग शर्यतीच्या प्रसारणाचा अभ्यास, प्रसारण पद्धती किंवा उपलब्ध माहिती या सर्वांचा अभाव होता. एक वर्षाच्या अथक मेहनतीतून हे शक्य झाले. रोशन स्वतः एक समालोचक आणि एक अग्रगण्य प्रसारक आहे. सायकलपटूंच्या वेगाशी स्पर्धा करण्याचे वेगळे आव्हान त्याला यावेळी पार पाडावे लागले.
कॅमेरा स्थिर ठेवून चित्रण करणे, ड्रोन स्विच करणे या सर्व गोष्टी एकत्रित नियंत्रण करण्यासाठी त्याच्या सोबत एक गाडी देखील प्रवास करत होती. या गाडीचा वेगही ताशी 50 ते 60 प्रतिकिलोमीटर इतका ठेवला जात होता. हे सर्व करण्यासाठी रोशनकडे 15 जणांचा संघ होता.
हा संघ एकाचवेळी प्रोडक्शन वाहन आणि मोटरसायकलवरून त्याला सहाय्य करण्यासाठी फिरत होते. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे देशभरातून अनेकजणांनी या शर्यतीचा आनंद थेट लुटला. रोशनला आता टूर डी फ्रान्सचे वार्तांकन आणि ऑलिम्पिक दरम्यान होणाऱ्या कॅप्सुलेटेड प्रसारण साद घालत आहे.