शिमला – हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत वाराणसी आयआयटीच्या तीन विद्यार्थ्यांसह एकूण सात पर्यटकांचा मृत्यू झाला असून अन्य 10 जण जखमी झाले आहेत. बंजार उपविभागातील घियाघीजवळ रविवारी रात्री 8.30 वाजता हा अपघात झाला.
या अपघातात पाच पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला.बंजारचे भाजप आमदार सुरेंदर शौरी यांनी सोमवारी सकाळी फेसबुकवर एक व्हिडिओ प्रसारित करून लोकांना अपघाताची माहिती दिली.
जखमींना प्रथम बंजार रूग्णालयात नेण्यात आले तेथून त्यांना प्राथमिक उपचारानंतर उपचारासाठी कुल्लू प्रादेशिक रूग्णालयात पाठवण्यात आले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अपघातग्रस्त भागात दुर्गम स्थिती असतानाही जिल्हा प्रशासन आणि स्थानिकांनी तेथे मोठी मदत केली.