काठमांडू – नेपाळच्या संसदेच्या प्रतिनिधीगृहाचे अधिवेशन 7 मार्च रोजी बोलावण्यात आले आहे. नेपाळच्या अध्यक्षा बिद्या देवी भंडारी यांनी हे अधिवेशन बोलावले. काही दिवसांपूर्वी विसर्जित केलेले प्रतिनिधीगृह सर्वोच्च न्यायालयाने पुनरुज्जीवित केले होते आणि 9 मार्च पूर्वी संसदेचे अधिवेशन बोलावण्याचे आदेशही दिले होते. त्यानुसार 7 मार्च रोजी संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याची नोटीस प्रतिनिधीगृहातील 275 सदस्यांना पाठवण्यात आली आहे.
या अधिवेशनादरम्यान पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळमध्ये सध्या उभी फूट पडलेली आहे. पंतप्रधान ओली आणि माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील गट आपले बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आपल्याला पंतप्रधानपदावरून हटवून दाखवावे, असे खुले आव्हान ओली यांनी प्रचंड यांच्या गटाला दिले आहे. प्रचंड यांनीही संसदेत आपल्याच गटाचे बहुमत सिद्ध करण्यासाठी विरोधी पक्ष असलेला नेपाळ कॉंग्रेस आणि जनता समाजबादी पार्टीसारख्या पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ओली यांच्यावर पंतप्रधानपद सोडाण्यासाठी दबाव येऊ लागला आहे. मात्र आपण राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.