कवर्धा – देशात करोना संसर्गाने थैमान घातलं आहे. मात्र या स्थितीतही करोना योद्धे जीवाची बाजी लावून रुग्णांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. डॉक्टर असो वा नर्स दोघेही रुग्णांना वाचविण्यासाठी लढा देत आहेत. मात्र या लढ्यात अनेक डॉक्टर आणि नर्स, कपाउंडर यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागत आहे. कवर्धा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली असून नुकताच बाळाला जन्म देणाऱ्या नर्सचा करोनाने मृत्यू झाला.
कवर्धा ब्लॉकच्या ग्राम लिमो येथे करोना संसर्गामुळे एका नर्सचं निधन झालं. या नर्सची पोस्टींग खैरवार खुर्द, लोरीमी, कवर्धा येथील प्राथमिक आऱोग्य केंद्रात होती. ९ महिन्यांपासून गर्भवती असलेली नर्स कोविड ड्युटीवर होती. गरोदरपणात नर्सने कापादाह गावात रूम किरायाने घेऊन आपलं कर्तव्य बजावलं.
मिळालेल्या माहितीनुसार, नर्स प्रभा बंजारे (२८) यांनी गरोदर अवस्थेत ड्यूटी बजावली होती. ३० एप्रिल रोजी प्रभा यांना प्रसववेदना सुरू झाल्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. तिथे सिझरियन ऑपरेशननंतर प्रभा यांनी एका मुलीला जन्म दिला. प्रभा यांना रुग्णालयात असताना अनेकदा ताप आला होता.
डिलेव्हरीनंतर रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर प्रभा यांना ताप आणि खोकला येत होता. त्यानंतर ऍन्टीजन टेस्टमध्ये प्रभा यांचा करोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातच ऑक्सिजन पातळी खालावल्यानंतर प्रभा यांना रायपूरला रेफर करण्यात आलं. मात्र तिथे उपचारादरम्यान प्रभा यांचा २१ मे रोजी मृत्यू झाला.
पती भेष कुमार यांनी प्रभा यांना गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यात सुट्टी घेण्यास सांगितले होतं. यावर प्रभा म्हणाल्या की, घरी बसून काय करू, यापेक्षा ड्यूटी करते. गरोदर असताना प्रभा यांनी करोना काळात कर्तव्य पार पाडत रुग्णांची सेवा केली. मात्र करोनाने प्रभा यांचाच बळी घेतला. गेल्या वर्षीच लॉकडाऊनच्या काळात प्रभा यांचा विवाह झाला होता.