मुंबई : जागतीक बाजारातून आलेले सकारात्मक संदेश, कंपनांच्या ताळेबंदातील वाढलेले नफे आणि गुंतवणूकदारांना करसवलती मिळण्याची शक्यता वाढल्याने कालच्याप्रमाणे आज बुधवारीही शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली.
परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 220 अंकांनी म्हणजे 0.55 टक्क्यांनी वाढून 40,051 अंकावर बंद झाला. तर विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 57 अंकांनी वाढून 11,844 अंकावर बंद झाला.
लाभांश वितरण कर रद्द करणे, दिर्घ मुदतीतील भांडवली नफ्यावरील कर व रोखे विनिमय कर कमी करण्याच्या शक्यतेवर सरकार गंभीरपणे विचार करीत असल्याचे वृत्त गेल्या आठवडयात अनेक वृत्त माध्यमांनी दिल्याने खरेदी वाढली असल्याचे बोर्क्सने सांगितले. त्याचबरोबर अमेरिका-चीन व्यापार युद्ध कमी होवून फेडरल रिझर्व व्याजदर कमी पातळीवर ठेवण्याचे संकेत मिळत असल्यामुळे जागतीक बाजारातून सकारात्क संदेश येत आहे.
आज झालेल्या खरेदीचा फायदा माहिती तंत्रज्ञान, तेल आणि नैसर्गिक वायू, ग्राहक वस्तू, भांडवली वस्तू, दूरसंचार आणि उर्जा क्षेत्रातील कंपनांना होवून या क्षेत्रातील निर्देशांक दिड टक्क्यांपर्यत वाढले. मात्र, खरेदीच्या परिस्थितीतही रिऍल्टी, धातू व वाहन क्षेत्रातील कंपनांच्या शेअरची विक्री होवून या क्षेत्रातील निर्देशांक 1 टक्क्यांपर्यत कमी झाले.
सेंट्रल बॅंक व इंडिगो तेजीत
सेंट्रल बॅंक 3353 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार असल्याने या बॅंकेचा शेअर बुधवारी तब्बल 17 टक्क्यांनी वधारला. हे भांडवल उभारण्यासाठी बॅंकेच्या संचालक मंडळानी परवानगी दिली आहे. या परवानगीमुळे बॅंकेची भांडवलीय परिस्थिती आणखी मजबूत होणार आहे. बुधवारी इंडिगो विमान कंपनीची पालक कंपनी असलेल्या इंटर ग्लोब एव्हिनेशन या कंपनीचे शेअर 7 टक्क्यांनी वाढले. या कंपनीने 300 विमानांची ऑर्डर एअर बस कंपनीला दिल्याचे वृत्त जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअरची जोरदार खरेदी केली.