मुंबई – सोमवारी शेअर बाजाराचे निर्देशांक ( stock market news today ) ब्रिटनमधील नव्या स्वरूपाच्या करोनामुळे 3 टक्क्यांनी कोसळले होते. दरम्यानच्या काळात अमेरिकेच्या संसदेने 900 अब्ज डॉलरच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर नव्या करोनामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता कमी आहे असे वाटल्यामुळे गुंतवणूकदारांनी मंगळवारी खरेदी केली. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक बऱ्याच प्रमाणात वाढले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ( bombay stock market ) सेन्सेक्स 452 अंकांनी म्हणजे 1 टक्क्यानी वाढून 46,006 अंकावर स्थिरावला. त्याचबरोबर ( national stock exchange ) राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 137 अंकांनी वाढून 13,466 अंकावर बंद झाला. शेअर बाजार निर्देशांक कोसळल्यामुळे काल रुपयाचे मूल्य 23 पैशांनी घसरले होते. आजही रुपयाच्या मूल्यात पाच पैशाचे घट होऊन रुपयाचा भाव 73.84 रुपये प्रति डॉलर या पातळीवर राहिला.
काल शेअर निर्देशांकात तीन टक्क्यांची घट झाल्यानंतर आज निर्देशांकात एक टक्क्याची सुधारणा झाली. माहिती तंत्रज्ञान, औषधी, ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांची मंगळवारी जास्त खरेदी झाली. निफ्टी निर्देशांकाशी संबंधित एचसीएल टेक्नॉलॉजी, अदानी पोर्ट, टेक महिंद्रा, इन्फोसिस, सन फार्मा, जेएसडब्ल्यू स्टील या कंपन्यांच्या शेअरच्या भावात चार टक्क्यापर्यंत वाढ झाली.
मात्र टाटा मोटर्स, हिंदाल्को, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. इंग्लंडबरोबरची विमानसेवा स्थगित करण्यात आल्यामुळे एकूणच विमान सेवावर परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे विमान कंपन्यांच्या शेअरच्या भावात मंगळवारी घसरण झाली. मात्र परदेशी संस्थागत गुंतवणूकदार आणखीही विचलित झाले नसून त्यांच्याकडून गुंतवणूक चालूच राहण्याची शक्यता आहे.