ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन

पुणे : स्त्रीवादाच्या भाष्यकार, ‘मिळून साऱ्या जणी’च्या संपादक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.

विद्या बाळ यांचा जन्म १२ जानेवारी १९३७ रोजी झाला. त्यांचे पदवी शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून झाले. त्यांनी बीए अर्थशास्त्र या विषयातून पदवी प्राप्त केली. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळाले पाहिजेत, यासाठी त्यांनी तरूणपणापासून लढा दिला. महाराष्ट्रात यासाठी एक चळवळ उभी करण्याचे काम विद्याताईंनी प्रयत्नपूर्वक केले.

सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी पुणे आकाशवाणी केंद्रावर सादरकर्त्या म्हणून काम केले. त्यानंतर त्या प्रख्यात ‘स्त्री’ मासिकाच्या सहायक संपादिका झाल्या. याच मासिकात त्यांनी संपादक म्हणूनही काम पाहिले. १९८९ मध्ये त्यांनी ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाची सुरुवात केली. या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे प्रश्न अग्रक्रमाने मांडले.

महिलांचे विषय मांडण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विद्याताईंनी नारी समता मंच या व्यासपीठाची स्थापन केली होती. ग्रामीण भागांतील महिलांमध्ये जागृती करण्यासाठीही त्यांनी खूप कष्ट घेतले. महिलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, पुरुषांच्या समान हक्कांसाठी, अत्याचारविरोधात, स्त्रीभ्रूणहत्याविरोधात विद्याताईंनी काम केले. यासाठी पथनाट्य, निदर्शने, मोर्चा, परिसंवाद, परिषदा या सर्व व्यासपीठांचा त्यांनी वापर केला. आपल्या लेखणीमधूनही त्यांनी हे विषय संवेदनशीलपणे हाताळले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.