मुंबई – ज्येष्ठ वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी काही काळ महाराष्ट्र शासनासाठीही काम केले. तसेच ते वृत्तनिवेदक, लेखक, अभिनेते देखील होते. त्यांनी आत्तापर्यंत जवळपास 18 पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले आहे. याव्यतिरिक्त ते मराठी नाट्यसृष्टीचे भाष्यकार म्हणूनही ते ओळखले जायचे.
डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी सुरुवातीच्या काळात पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये काही काळ नोकरी केली. त्यानंतर त्यांची मीडियासंबंधी कारकीर्द दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून सुरू झाली. दिल्ली आकाशवाणीवरुन पहिल्या मराठी बातम्या वाचणारे ते निवेदक ठरले. तसेच ते मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक देखील होते. शिवाय ते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालकही होते. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे खातेप्रमुख होते. सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आणि कम्युनिकेशनचे ते संस्थापक होते.