सांगवीत उघड्यावर अन्नपदार्थ विक्री; अन्नभेसळ विभागाचे दुर्लक्ष

  • उघड्यावरील खाद्यपदार्थ आरोग्यास घातक

पिंपळे निलख – सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी आदी परिसरात चौका चौकांमध्ये, रस्त्यावर अनेक ठिकाणी उघड्यावरच खाद्यपदार्थांची विक्री सुरू आहे. उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सगळीकडे होताना दिसून येत आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व व्यवसाय बंद असताना अनलॉक झाल्यानंतर छोटे मोठे व्यवसाय सुरू होत आहेत. परंतु त्यांच्याकडून स्वच्छता, करोनाच्या पार्श्‍वभूमीवर योग्य ती काळजी घेणे अपेक्षित आहे. परंतु तसे होताना दिसून येत नाही. या सर्व गोष्टीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

खाद्य पदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक कोणत्याही प्रकारे काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. सांगवी परिसरात जवळपास सर्वच ठिकाणी या लहान विक्रेत्या सोबत काही मोठी हॉटेलही स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.

सांगवी परिसरात असलेले जवळपास शंभर ते दीडशे खाद्यपदार्थ विक्रेते आहेत. खाद्यपदार्थ झाकून ठेवणे, जाळी ठेवणे, पिण्याचे पाणी स्वच्छ ठेवणे इत्यादी बाबतीत विक्रेते दुर्लक्ष करताना दिसून येतात. असे अस्वच्छ अन्नपदार्थ खालल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. बाहेरचे अन्नपदार्थ खालल्याने नागरिकांना घशाचे तसेच पोटाचे विकार होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत असे डॉक्‍टर सध्या सल्ला देत आहेत.

सांगवीतील काटेपुरम चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, साई चौक, कृष्णा चौक इत्यादी भागात सकाळी आणि संध्याकाळी खाद्यपदार्थ विक्रेते व ग्राहकांची गर्दी असते आणि याच भागात बहुतेक हॉटेल्स असून अनेक हातगाडीवाले रोडवर आपला व्यवसाय करताना दिसून येतात. सांगवीतील मोठ्या चौकात संध्याकाळी अनेक हातगाडी वाले वडापाव तसेच चयनीज इत्यादी खाद्यपदार्थ विकतात पण येथील खाद्यपदार्थ देताना प्राथमिक स्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन होताना दिसून येते.

मात्र प्रशासन या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून येत असून, महापालिका प्रशासन आणि अन्न औषध प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. हा जनतेचा प्रश्न असून प्रशासनाकडे नागरिकांच्या आरोग्यासाठी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून अनधिकृत आणि दोषी खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी जनतेतून मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.