कांदा निर्यात बंदी त्वरित मागे घ्या; मोदी सरकारच्या निर्णयाने पाकला लाभ होईल

शरद पवार यांची मागणी

नवी दिल्ली – केंद्र सरकारने सोमवारी अचानक कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यातून शेतकऱ्यांचे तर नुकसान होणार आहेच पण आंतरराष्ट्रीय बाजारातील चांगल्या भावाच्या स्थितीचा पाकिस्तान अधिक लाभ उठवण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्वरित कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, या निर्णयाच्या संबंधात मी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना या निर्णयाचा फेरविचार करण्यास सांगण्यात आले आहे. भारताकडून आखाती देशात जो कांदा निर्यात केला जातो त्या निर्यातीचा भारताचा वाटा या बंदीमुळे कमी होणार आहे. त्याचा लाभ पाकिस्तानसारखा देश घेऊ शकतो त्यामुळे भारताने या निर्णयाचा फेरविचार करण्याची आत्यंतिक गरज आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याला चांगली मागणी आहे. आपण सातत्याने कांदा निर्यात करीत आहोत. भारत हा कांद्याचा खात्रीशीर निर्यातदार देश आहे, अशी भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला या बंदीमुळे धक्का बसणार आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील कांद्याच्या लासलगाव येथील मार्केटमध्ये कांद्याचा दर 30 रुपये किलोवर गेल्यानंतर मोदी सरकारने काल अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. त्यावर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्‍त केला आहे. काल रात्रीच आपल्याला अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे फोन आले. त्यांच्या या भावना आपण पियुष गोयल यांच्या कानावर घातल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या या कांदा निर्यात बंदीचा केवळ महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांनाच नव्हे तर संपूर्ण देशातील कांदा उत्पादकांना मोठा तोटा होणार आहे, असे ऑल इंडिया किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनीही म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.