काही वेळेस सेल्फीमुळे एखाद्यावर शेरेबाजी करणे, त्याला खिजवणे असे प्रकारही सोशल मीडियावर होत असतात. अशा नकारात्मक कमेंटमुळे तरुणाईच्या मनावर खोल परिणाम होऊ शकतो. एखाद्याच्या कमकुवत मनावर ओरखडे उमटू शकतात.
ऑक्सफर्डच्या डिक्शनरीनुसार, सेल्फी म्हणजे एखाद्याने स्वत:चा काढलेला फोटो, स्मार्टफोन किंवा वेबकॅमद्वारे असा स्वत:चा फोटो काढून सोशल मीडियावर टाकणे. २०१३ साली ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये सेल्फी हा त्या वर्षीचा शब्द म्हणून जाहीर करण्यात आला. आता सेल्फी का बरं इतका लोकप्रिय झाला असेल.. तो अगदी सहजपणे काढता येतो म्हणून की, अगदी मनाजोगता सेल्फी येईपर्यंत पुन्हा पुन्हा तो काढता येतो म्हणून किंवा एखाद्या व्यक्तीमधील सर्वोत्तमता दर्शवणा-या पोजमध्ये किंवा चेह-यावरील हावभावांप्रमाणे तो टिपता येतो म्हणून.
जेव्हा सेल्फी काढण्याची अविरत गरज वाटू लागते, तसे करता न आल्यास बेचैन व्हायला होते आणि सेल्फी काढणे व ते सोशल मीडियावर टाकणे या गोष्टी इतर कार्यक्रमांपेक्षा महत्त्वाच्या वाटू लागतात, तेव्हा सेल्फीचे व्यसनच लागलेले असते. यामुळे काही वेळेस बॉडी डिसमोर्फिक डिसऑर्डर किंवा आत्मविश्वासाचा अभाव यांसारख्या गोष्टींमुळे मानसिक स्वास्थही बिघडते. जर कुणाला सेल्फीचे व्यसन असल्याचे आढळले, तर त्यांच्या मानसिक आरोग्याचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. काही ठरावीक परिस्थितीत समुपदेशन आणि औषधोपचार यांसारख्या गोष्टींमुळे त्याचा उपयोगही होऊ शकतो.
बहुतांश केसमध्ये, सेल्फी घेणं अजिबात त्रासदायक नसतं. स्वत:च्या भावनांसह आत्मविश्वासाने तरुणाई आपण उत्तम दिसतोय हे पाहू शकते आणि अनेक वर्षापर्यंत आपले दिसणे अगदी आहे तसेच ठेवण्याचा प्रयत्न करू शकते. पण, यामध्ये एक अडचणही आहे. काही वेळेस सेल्फीमुळे एखाद्यावर शेरेबाजी करणे, त्याला खिजवणे असे प्रकारही सोशल मीडियावर होत असतात. अशा नकारात्मक कमेंटमुळे तरुणाईच्या मनावर खोल परिणाम होऊ शकतो, एखाद्याच्या कमकुवत मनावर ओरखडे उमटू शकतात.
एक उत्तम सेल्फी खेचता आला नाही, म्हणून तणावाखाली आलेल्या पौंगडावस्थेतील काही मुलांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची उदाहरणंही आहेतच. याशिवाय धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढायचा प्रयत्न केल्यास अपघात घडतात. गेल्या दोन वर्षात जगभरात सेल्फीमुळे सर्वात जास्त मृत्यू भारतात झाल्याची नोंद आहे.