बांधकाम मिलिंद काकडे तर घोरपडेंकडे आरोग्य अन् नारकरांकडे पाणीपुरवठा
सातारा – सातारा पालिकेत शनिवारी तीन समित्यांचे सभापती अपेक्षेप्रमाणे बदलण्यात आले. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या मिलिंद काकडे यांना बांधकाम सभापती पदावर काम करण्याची संधी दिली. या निवडीची घोषणा छत्रपती शिवाजी सभागृहात पीठासन अधिकारी रवीद्र पवार यांनी केली.
पालिकेच्या विविध विषयांच्या सभापती निवडी बिनविरोध पार पडल्या असून या सभापती निवडीत उदयनराजे भोसले यांनी भाजपला संधी दिली आहे. यामध्ये भाजपच्या मिलिंद काकडे यांची बांधकाम सभापतीपदी निवड केली आहे. तर सातारा विकास आघाडीच्या अनिता घोरपडे यांची आरोग्य सभापती पदी, पाणीपुरवठा सभापती पदी यशोधन नारकर यांची निवड झाली. तर शिक्षण मंडळ सभापती पदावर उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांची फेरनिवड जाहीर करण्यात आली.
महिला बालकल्याण सभापती सुनीता पवार व नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे यांना मुदतवाढ दिली आहे. स्थायी समितीवर नगर विकास आघाडीतर्फे दीपलक्ष्मी नाईक यांना संधी मिळाली आहे. आज झालेल्या निवडीवर कभी खुशी कभी गमचे वातावरण सभागृहात दिसून आले साताऱ्यात एकही खड्डा दिसणार नसल्याचे बांधकाम सभापती मिलिंद काकडे यांनी सांगितले सभापती निवडीनंतर नगराध्यक्ष माधवी कदम यांनी सर्व सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.