शिरूरच्या बोराडे मळा येथील नागरिकांचा सवाल : ठशांवरून ठरवले कुत्रे, तरस, बिबट्या
शिरूर – बोराडे मळा (शिरूर) जवळ शेतामध्ये काम करणाऱ्या महिला व लहान मुलांना बिबट्या दिसला;परंतु तेथे पाहणी करण्यासाठी आलेल्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना तो बिबट्या, कुत्रे, तरस असल्याचे वेगवेगळे तर्क त्यांनी ठसे पाहून सांगितले. मात्र, उपस्थित नागरिकांना वनविभाग या कर्मचाऱ्यांची कीव आली तर अनेकांनी वनकर्मचारी व अधिकाऱ्यांची डोके फिरले का? असा सवालही उपस्थित केला.
बोराडे मळा परिसरात गुरुवारी (दि. 2) एका नर जातीच्या बिबट्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच शनिवारी (दि. 4) बोराडे मळा येथील शेतात काही महिला शेतात काम करत होत्या, त्यावेळी त्यांचे मुले त्याठिकाणी खेळत होते. अचानक मुलाच्या ओरडण्याचा आवाज आला आणि तो बिबट्या बिबट्या म्हणून पळू लागला, त्याच्या मागे महिलाही पळाल्या काही वेळातच तेथे नागरिक गोळा झाले, व त्यांनी शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. काही वेळातच तेथे वनकर्मचारी आली त्यांनी तेथे असलेल्या ठसे यांची पाहणी केली असता त्यांच्यातील एका कर्मचाऱ्यांनी हे ठसे बिबट्याचे असल्याचे सांगितले.
त्यानंतर काही वेळातच तेथे आणखी वन विभागाचे कर्मचारी व वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एन. म्हसेकर तेथे आले यावेळी त्यांच्यातील काही कर्मचाऱ्यांनी हे ठसे तरसाचे असल्याचे सांगितले, तर काही कर्मचाऱ्यांनी हे ठसे कुत्र्याच्या असल्याचे जावईशोध लावला यामुळे वन खात्याचा भोंगळ कारभार नागरिकांसमोर आला. ज्या मुलाने बिबट्या पाहिला त्याची परीक्षाच घेण्यास वन अधिकाऱ्यांनी सुरुवात केली. हा मुलगा खोटे बोलतो आहे, त्याच्या आवडत्या लोकांनाच यावेळी तिथे आणले. त्यावेळेस तेथे उपस्थित नागरिकांनी वन विभागाचे अधिकारी यांना उलट प्रश्न केल्यानंतर; मात्र वन अधिकारी जागेवर आले आणि या भागामध्ये वन विभागाच्या वतीने गस्त घालण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पिंजरा लावण्याची मागणी
शिरूर शहरातून या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉकला वृद्ध व तरुण महिला पुरुष मोठ्या प्रमाणामध्ये फिरत असतात त्याचे अस्तित्व या भागात दिसून आल्याने या लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाच्या वतीने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन कोणावर हल्ला होण्याअगोदरच या भागात पिंजरा लावून बिबट्याला बंदिस्त करणे गरजेचे आहे.
केवळ आपल्याला काम वाढेल यामुळे येथे बिबट्याचे अस्तित्व नाही असणारे त्याचे बिबट्याचे नाही असे सांगून नागरिकांची शेतकऱ्यांची दिशाभूल वनविभागाने करणे बंद करावे, तसेच बोराडे मळा, बाबुराव नगर, थापे मळा, गोरे मळा, महाजन मळा, रामलिंग या भागातील नागरिकांनी करून लवकरात लवकर येथे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.