राजगुरूनगर – सातकरस्थळ (ता. खेड) ग्रामपंचातीच्या माध्यमातून नवीन वर्षात ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली असून त्याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीत जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था पुणे यांच्यावतीने आरओ (फिल्टर) प्लॅंट बसविण्यात आला असून त्याचे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे सामाजिक दायित्व निधी विभागाचे प्रमुख पंकज वल्लभ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. वल्लभ, संस्थेचे झोनल अधिकारी अनिल भंडारी, सातकरस्थळ ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनी थिगळे, माजी सरपंच अजय चव्हाण, वैशाली मारणे, ग्रामविकास अधिकारी राजाराम रणपिसे, साहेबराव नवले, पी. एल. मेश्राम, यांच्यसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन कार्यक्रम 2019-20 या अंतर्गत सातकरस्थळ पश्चिम भागात आरओ प्लॅंट साठी 3 लाख 92 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच याभागातही शुद्ध पाणी मिळणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकरी राजाराम रणपिसे यांनी सांगितले.