नवी दिल्ली – कोव्हॅक्सिन या करोनावरील लसीचे उत्पादन करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) हाती सोपवण्यात आली आहे.
त्यामुळे त्या कंपनीच्या हैदराबादस्थित परिसरात पुढील आठवड्यापासून सीआयएसएफच्या 64 सशस्त्र कमांडोंचे पथक तैनात असेल. भारत बायोटेकला सुरक्षा कवच पुरवण्याचा प्रस्ताव नुकताच केंद्रीय गृह मंत्रालयाने मंजूर केला.
देशाच्या वैद्यकीय आणि आरोग्यविषयक सुरक्षेच्या निश्चितीचा विचार करता भारत बायोटेक ही महत्वाची आस्थापना आहे. साहजिकच, त्या कंपनीला देशविरोधी घटकांपासून धोका आहे. त्यामुळे कंपनीच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलण्यात आले, अशी माहिती सरकारी सुत्रांकडून देण्यात आली. देशातील महत्वाच्या आस्थापनांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी आधीपासूनच सीआयएसएफवर सोपवण्यात आली आहे.